प्रतिनिधी : कोकणधारा
सावर्डे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओमळी गावात समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम म्हणाल्या की, महिलांनी अनेक अडचणींवर मात करत प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र कष्टकरी महिलांना रोजच्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. स्त्री सन्मान हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला दिनाचे औचित्य साधून समाजात निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम यांच्या संकल्पनेतून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा वावरे, सीआरपी संध्या सुर्वे, अरुणा घाडगे, वैष्णवी चव्हाण तसेच ज्ञानदीप वाचनालयाच्या सचिव सौ. बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात सन्मानित महिलांनीही आपले अनुभव व्यक्त केले. गावातील बालकांचे पोषण, आरोग्य आणि संगोपन यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने परिश्रम घेत असतात. त्यांच्या या कार्यामुळे समाजाच्या आरोग्यदायी भवितव्याला बळ मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.















