प्रतिनिधी : कोकणधारा
माणगाव : मुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना प्रवाशांवर तीन टोल नाक्यांचा भार टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे जोडरस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला असून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
१६ वर्षांपासून रखडलेले काम
मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी तसेच ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांनंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे.
नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे सुरूच आहेत, तर माणगाव आणि इंदापूर बायपासही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत टोल वसुलीची तयारी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
टोल दर अद्याप जाहीर नाहीत
टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यास वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गावांकडे जाणारे रस्ते निकृष्ट
पळस्पे ते इंदापूर या टप्प्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र हे जोडरस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी ब्लॉक टाकून तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सुविधा अपुऱ्या, नागरिकांचा सवाल
महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुलीची घाई का केली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारणी करावी तसेच सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपूर्ण महामार्गावर टोल आकारणीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. तसेच याविरोधात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.















