विशेष प्रतिनिधी, कोकणधारा
खेड : मुंबई–गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (एमएच ०८ बीबी ५७९०) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली.
या अपघातात अद्वैत महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.
दरम्यान, अद्वैत आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.















