प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुंडे तर्फे चिपळूण येथे विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन तसेच पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
यानंतर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले तसेच पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सौ. वैशाली जाधव, मुख्याध्यापक श्री. विलास पवार, पदवीधर शिक्षक श्री. संजय सुर्वे, सहशिक्षिका श्रीमती ज्योती भोसले तसेच सहशिक्षक श्री. रोशन निकम उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री. अविनाश शंकर पालशेतकर यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपप्राचार्य सौ. स्नेहल कुलकर्णी व पर्यवेक्षिका सौ. सुजाता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवा भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.















