प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पीपास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वातावरण तापले असून या मुद्द्यावरून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. ६ एप्रिल रोजी खेड येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
लोटे एमआयडीसीत कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पीपास रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. हेच रसायन इटलीमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ६ एप्रिल) खेड येथे मोठा मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, वाद वाढत असतानाच लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने पहिल्यांदाच अधिकृत भूमिका मांडली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिपळूणऐवजी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले.
कंपनीकडून सांगण्यात आले की, पीपास रसायनाचे उत्पादन करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे आणि या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.
तसेच, इटलीतील प्रकरणाशी तुलना करणे चुकीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून स्थानिक नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कंपनीने नमूद केले.















