लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना जेलमध्ये ठेवायचं की इतर कोणती व्यवस्था करायची, यावर निर्णय घेतला जाणार आहे. वांगचुक यांच्यावर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांना उचकावल्याचा आरोप आहे.
डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांच्या नेतृत्वाखालील लडाख पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. वांगचुक यांना अटक झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लेहमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटची गती कमी करण्यात आली आहे.
दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसक झडप झाली होती. यात ४ जणांचा मृत्यू झाला तर ९० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोलिस व अर्धसैनिक दलांकडून कर्फ्यूचे काटेकोर पालन करवून घेतले जात आहे. आतापर्यंत ५० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.