प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत (भैय्या सामंत) यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे कोकणातील पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य या बाबींमुळे किरण सामंत यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.















