प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा. श्री. अनिलशेठ दाभोळकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते बुधवार दि. १ एप्रिल २०२६ या कालावधीत खेर्डी बाजारपेठेतील “कै. अजित दादा पवार क्रीडानगरी” येथे भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या माध्यमातून गेल्या सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केले जात असून, यंदाचे हे चौथे पर्व ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे खेर्डी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जयंद्रथशेठ खताते, अनिलशेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, प्रकाश शेठ साळवी यांच्यासह खेर्डीतील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी खेळविण्यात येणार असून, याच दिवशी प्रमुख पाहुणे, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अनिलशेठ दाभोळकर यांचा ७० वा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १६ नामांकित संघ सहभागी होणार असून, स्पर्धा रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेर्डी तसेच संपूर्ण चिपळूण तालुक्यातील कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा थरार अनुभवावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.















