प्रतिनिधी : कोकणधारा
मुंबई : चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील विविध अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांनी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी मंत्री पाटील यांनी प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातही कामे सुरू आहेत. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी, अपुरी साधनसामग्री आणि ठेकेदारांची रखडलेली बिले यामुळे कामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सावर्डे, सावर्डे खुर्द व कासारवाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण २८ हजार मीटर अतिरिक्त पाईपलाईन आवश्यक आहे. त्यापैकी १५ हजार मीटर काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित १३ हजार मीटर पाईप उपलब्ध नसल्याने योजना अपूर्ण आहे. हे पाईप ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही.
तसेच ओवळी-कळकवणे-वालोटी योजनेत मुख्य स्त्रोत व पाणी आरक्षण मंजूर असूनही जोडणी व इतर कामे प्रलंबित आहेत. यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी निकम यांनी केली.
बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
चौकट :
योजना मार्गी लावण्यासाठी तातडीचे निर्णय आवश्यक – निकम
कोकणातील डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निकम यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील ३७८ योजनांपैकी केवळ ४९ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून ७५ ते १०० टक्के प्रगतीतील योजनांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सुमारे ९३ कोटी रुपयांची ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने देऊन कामांना गती द्यावी, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.















