प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावरकर सभागृह येथे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वुमन्स डॉक्टर विंग, चिपळूण शाखेतर्फे १० मार्च रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच कष्टकरी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. अंजली शारंगपाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शनपर व्याख्यानांनी झाली. अॅडव्होकेट वृषाली सावंत यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल युगात महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ समीना दलवाई यांनी मासिक पाळीतील तक्रारी, लक्षणे व उपचार तसेच मेनोपॉज काळातील शारीरिक व मानसिक बदलांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात चिपळूणची लेक समृद्धी देवळेकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. फ्रीडायविंग या अनोख्या जलक्रीडेत तिने उल्लेखनीय यश मिळवले असून ती प्रमाणित फ्रीडायविंग इन्स्ट्रक्टर बनली आहे. एका श्वासावर खोल समुद्रात डुबकी मारण्याच्या या क्रीडाप्रकारात ती सध्या सुमारे १२० फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि चार मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते.
याचबरोबर कालुस्ते खुर्द येथील समरीन जमालुद्दीन कादरी हिचाही सन्मान करण्यात आला. वक्तृत्व, निबंध, कथा कथन आणि पुस्तक परीक्षण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिला डी.बी.जे. महाविद्यालयच्या ‘अभिमान पुरस्कार २०२५-२६’ने गौरविण्यात आले आहे.
तसेच श्रम साफल्य महिला स्वयंसहायता संघाच्या सचिव पल्लवी रहाटे आणि चिपळूण पंचायत समितीच्या हॉटेल कँटीन चालक सारिका मेढेकर या कष्टकरी महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या रहिमत जबले यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव, आयएमएचे चेअरमन अब्बास जबले, सेक्रेटरी अरविंद पोतदार, वुमन्स डॉक्टर विंगच्या चेअरमन मनीषा वाघमारे, व्हाईस चेअरमन वनिता सानप तसेच विविध डॉक्टर, परिचारिका व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















