प्रतिनिधी : कोकणधारा
गुहागर : जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक व वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत गुहागर येथे एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शनिवारी (१४ मार्च २०२६) गुहागर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
यावेळी गुहागर ते शृंगारतळी मार्गावर संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) याला पोलिसांनी अडवून तपासणी केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे आढळून आली.
पोलिसांनी आरोपीकडून एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा, आठ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९च्या कलम ३ (२५) अन्वये गुहागर पोलीस ठाणे येथे गुन्हा (रजिस्टर क्र. १९/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत तसेच चालक अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.















