प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या धाडसी व यशस्वी कामगिरीबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशशेठ काटकर, उपाध्यक्षा सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, विश्वस्त शर्मिला मोरे, स्मिता सरदेसाई, प्रमोदशेठ लाड, संजय अवटी, सहा सेक्रेटरी धनश्री जोशी, सदस्य संपदा लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूण नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनीही उपस्थित राहून देसाई यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना सेक्रेटरी संतोष इनामदार यांनी प्रभात रोड फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. सन 2000 पासून नारायण तलाव संवर्धन, परिसरातील मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच आपत्ती काळात मदत अशा विविध उपक्रमांद्वारे फाउंडेशनने समाजात भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीजा देसाई यांनी वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ठाणे वन विभागात कार्यरत असताना 30 हून अधिक बिबट्यांची सुखरूप सुटका केली, तसेच 200 हून अधिक वन्यप्राण्यांचे प्राण वाचवले. अवैध तस्करीविरोधात कारवाई करत 50 हून अधिक वाहने जप्त करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले.
वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करणे, झाडे लावणे व ती जगविणे, तसेच जनजागृती मोहीम राबविणे या बाबींमध्ये त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे वन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व सुबक झाले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी गिरीजा देसाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.















