प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : जिल्ह्यात गॅस बुकिंग नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस ग्राहकांना गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेवा केंद्रांनी मदत करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजीत गाताडे यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात काही कारणास्तव गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. गॅस बुकिंगसाठी नागरिकांना वितरकांकडे रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक व वितरक या दोघांचाही वेळ वाया जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
याची दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना गॅस बुकिंग नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रक्रियेत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित सेवा केंद्राला जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.















