प्रतिनिधी : कोकणधारा
खेड (प्रतिनिधी): खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ॲक्टिव्हा दुचाकीवरून प्रवास करत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक अत्यंत भीषण असल्याने खामकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत खेड-दापोली महामार्गावर रस्ता रोको केला. सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी एका संशयित वाहनाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.















