प्रतिनिधी : कोकणधारा
राजापूर : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख निर्माण करून तिचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात घडल्याने राजापूर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची फेसबुकद्वारे ओंकार सुर्वे (रा. नेर्ले, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२५ मध्ये ती ओंकार सुर्वे व त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांच्यासोबत वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा परिसरात गेली होती. वेळ झाल्याने ती मयूर सुर्वे यांच्या जुन्या घरी नेण्यात आली. त्या ठिकाणी मयूर सुर्वे याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर ओंकार सुर्वे याने जबरदस्तीने संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.
त्यानंतर दि. १४ मार्च २०२६ रोजी पंकज पवार (रा. ताम्हणे, ता. राजापूर) याने संबंधित मुलीशी संपर्क साधून तो अश्लील व्हिडिओ पाठवत धमकी दिली. “माझी मागणी मान्य केली नाही तर व्हिडिओ व्हायरल करीन,” असे सांगून दबाव टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या बहिणीला संपर्क करून सर्व घटना सांगितली. बहिणीच्या धीरामुळे तिने दि. १५ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बीएनएस कलम ६४(१), ७४, ७९, ३५१(२), पोस्को कायदा कलम ४, ८, १२ तसेच आयटी कायदा कलम ६७, ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळ वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास तेथे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.















