दोडामार्ग : भूषण सावंत
दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग येथे आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार असून या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पहिल्या टप्प्यात भाजपला संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन महिला सदस्यांपैकी सभापतीपदाची संधी नेमकी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्य सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्य सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत आहेत. विजयानंतर या दोघींमधील कोणाला सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) असा राहणार आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे बिनविरोध कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असून ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आज होणाऱ्या या निवड प्रक्रियेनंतर दोडामार्ग पंचायत समितीच्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट होणार असून तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.















