प्रतिनिधी : कोकणधारा
मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले.
देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.















