स्थानिक मुद्दे आणि मतदारांचा कल
रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणं आता नव्या वळणावर आहेत. स्थानिक पातळीवर “विकास”, “स्थानिकांना रोजगार” आणि “शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ” हेच मतदारांच्या मनातील प्रमुख मुद्दे ठरत आहेत.
भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या मते —
“एमआयडीसी जिल्हा परिषद हद्दीत असतानाही स्थानिक युवकांना औद्योगिक रोजगाराचा थेट लाभ मिळत नाही. बी.एस्सी., आय.टी.आय. आणि इंजिनिअरिंग पदवीधर तरुणांना संधी मिळावी, तसेच मुलींसाठीही स्थानिक रोजगार निर्मितीत प्राधान्य द्यावं — हेच आमचं ठाम मत आहे.”
तालुक्यातील उद्योगधंद्यांना पर्यावरणीय मंजुरी (EC) न मिळाल्याने काही प्रकल्प ठप्प आहेत. परिणामी रोजगार निर्मितीवर परिणाम झाला आहे. शेतकरी मात्र दुसऱ्या संकटाला सामोरे जात आहेत — डावा आणि उजवा कालवा अद्याप अपूर्ण असल्याने सिंचनासाठी पाण्याची टंचाई आहे. उन्हाळ्यात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.
अमित घाग पुढे सांगतात —
“आदिवासी, धनगर, ठाकूर आणि बौद्ध समाजांसह सर्व घटकांना मूलभूत सुविधा आणि शासनाच्या योजना सहज उपलब्ध व्हाव्यात, महिला सक्षमीकरणाला गती मिळावी, बचत गटांना उद्योगांशी जोडावं — ही आमची प्राथमिकता आहे.” पंतप्रधान जल जीवन योजना रोहा तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेला सक्रिय भूमिका बजावावी लागेल, असंही भाजपचं मत आहे.
औद्योगिक बदलाचे नवे संकेत: अदाणी रेल्वे प्रकल्प केंद्रस्थानी
या मतदारसंघातून जाणारा रोहा–दिघी बंदर अदाणी रेल्वे प्रकल्प हा भविष्यातील विकासाचा निर्णायक टप्पा ठरत आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.
भाजपच्या मते, या प्रकल्पातून स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि नागरिक यांना थेट लाभ मिळावा, त्यांचा सहभाग वाढावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचं योग्य मूल्यांकन व्हावं, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
“हा प्रकल्प उद्योग आणि शेती यांच्यातील सुवर्ण दुवा ठरणार आहे,” असं अमित घाग म्हणतात.
शेतकरी आणि शहरीकरणाचे आव्हान
रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्ती, पिकविमा अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याच वेळी घोसाळ, चनेरा, सानेगाव, कोकबण, विरझोली, वाळी, भुनेश्वर–
वर्से, धाटाव, नागोठणे आणि आंबेवाडी या पट्ट्यात झपाट्याने वाढणारं शहरीकरण नव्या समस्या निर्माण करतं आहे — रस्ते, गटार, पाणीपुरवठा आणि नियोजनाच्या प्रश्नांकडे गंभीरतेने पाहणं आवश्यक आहे.
मतदारांचा कल आणि बदलतं राजकारण
रोहा तालुक्यातील मतदार आता स्पष्ट दिशेने विचार करत आहेत — “विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायी नेतृत्व” या तत्त्वांकडे कल झुकलेला आहे.
भाजपकडे स्थानिक संघटन आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाया असल्याने या निवडणुकीत त्यांचा आत्मविश्वास ठळकपणे दिसतो.
“युती असेल तर विकासासाठी, नसेल तरी आम्ही स्वबळावर विजय मिळवू शकतो,” असं आत्मविश्वासाने म्हणत अमित घाग स्पष्ट करतात की, भाजपने नेहमीच “युतीधर्म प्रामाणिकपणे पाळला”, परंतु निर्णय नेहमी जनतेच्या हितासाठी घेतले.
त्यांच्या मते, भाजप कार्यकर्त्यांचा जोम आणि मतदारांचा विश्वास यावरच रोहा तालुक्याचं राजकीय समीकरण या वेळी ठरणार आहे.
रोहा तालुका सध्या संक्रमणाच्या टप्प्यावर आहे — ग्रामीण प्रश्न, औद्योगिक संधी आणि रोजगारनिर्मिती यांचं संतुलन साधणं हेच येणाऱ्या निवडणुकीचं खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरणार आहे.
मतदार आता वचनांवर नाही, तर प्रभावी नेतृत्वाच्या कामगिरीवर भर देत आहेत. आणि रोहा तालुक्यात तो आत्मविश्वास सध्या भाजपच्या छावणीत अधिक ठळकपणे दिसतो..


















