प्रतिनिधी : कोकणधारा
मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी धावणारी ही पॅसेंजर ट्रेन सध्या फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवा स्थानकापर्यंत जाऊन ट्रेन पकडावी लागत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, हे मनसेला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास “मनसे स्टाईल” आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली, मात्र आज त्याच कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची खंत व्यक्त करत, हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी मनसेने केली आहे.















