प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : चिपळूण-तिवरे एस.टी. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाने चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली. या प्रकारामुळे काही काळ बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास (क्र. एमएच २० बीएल २४३७) ही एसटी बस तिवरे गावाकडे जात असताना प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंत असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. यावरून आरोपीने संतापून चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) व वाहकासोबत वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने चालकाला मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या चेहऱ्यावर नख लागून दुखापत झाली असून त्यांचा शर्टही फाटला. तसेच वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील सुमारे ८०० रुपये गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा (रजिस्टर नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















