प्रतिनिधी : कोकणधारा
महाड, दि. २० : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे आयोजित या कार्यक्रमात शताब्दी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजनही करण्यात आले.
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अदिती तटकरे, डॉ. उदय सामंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, अण्णा बनसोडे, खासदार सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९२३ मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा असूनही समाजातील भेदभाव कायम होता. त्या अन्यायाविरोधात उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला.
“भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. विषमता आणि अस्पृश्यता दूर करून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणातील ९८ वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली, तर भरत गोगावले यांनी महाडचा विकास शताब्दीपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास करून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले.















