प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : राज्यात इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशारा देतात, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगतात. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
“जर राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, तर मग केरोसिन वितरणाचा निर्णय का घेण्यात आला?” असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अफवा पसरवण्याच्या बाबतीत भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
इंधन पुरवठा, संभाव्य संकटाची चर्चा आणि सरकारच्या निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चांना उधाण आले असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे















