प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. बौद्धवाडी) हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित इसम घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. झडतीदरम्यान पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ₹७०,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४/२०२६ नोंद करून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.















