प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण (प्रतिनिधी) : भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडळ अध्यक्ष विनोद भुरण तसेच जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते खेर्डी येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल सौ. आदिती गुडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भिले गावच्या सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, खेर्डीच्या सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.















