हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया
ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडीवर असलेले नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एका तरुणाशी झालेल्या संभाषणात हाके यांनी आपला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन पैसे घेण्याची तयारी दाखवल्याचा आरोप आहे. या संभाषणात तरुणाने “तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, पेट्रोलसाठी मदत करतो” असं सांगत एक लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी “मी अकाउंटवर पैसे घेत नाही, ड्रायव्हरचा नंबर देतो” असं म्हटल्याचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी त्याच तरुणाने हाके यांना सुनावत, “तुम्ही सुपाऱ्या घेऊन समाजविरोधी काम करता, लाज कशी वाटत नाही?” अशी टीका करत फोन कट केल्याचं क्लिपमध्ये आहे. या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “हा माझा नव्हे तर मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा हेतू संशयास्पद आहे. मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे, पण माझं आंदोलन थांबणार नाही.” दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात “मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असे वक्तव्य केले होते. यावर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मीही देवाला प्रार्थना करीन की पुढच्या जन्मी मला ब्राह्मण समाजात जन्म द्या, तेव्हाच त्यांना कळेल.” हाके यांनी पुढे मनोज जरांगेवरही टीका करत, “जरांगे यांनी दिल्ली नाही तर आफ्रिकेत आंदोलन करायला हवं, तिथे जास्त गरज आहे” असं म्हटलं.
हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया Read More »