मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात तब्बल ₹60.40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा संबंध 2015 मध्ये सुरू झालेल्या ‘बेस्ट डील टीव्ही’ (Best Deal TV) या त्यांच्या टेलिशॉपिंग कंपनीशी आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केली आहे.
काय आहे प्रकरण?
व्यावसायिक दीपक कोठारी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2015 ते 2023 या काळात 60 कोटी रुपये घेतले. हे पैसे व्यवसाय विस्तारासाठी घेतले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या मते, हा व्यवहार कर्ज असल्याचे दाखवण्यात आले, मात्र नंतर कर बचतीसाठी त्याला गुंतवणुकीत रूपांतरित करण्यात आले.
लेखी हमी आणि संचालकपदाचा राजीनामा
कोठारी यांच्या दाव्यानुसार, एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टीने त्यांना गुंतवणुकीबाबत लेखी हमी दिली होती. परंतु, काही महिन्यांतच तिने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. नंतर या कंपनीविरुद्ध ₹1.28 कोटींचे दिवाळखोरी प्रकरण सुरू असल्याची माहिती उघडकीस आली.
पुढे काय?
या प्रकरणाचा तपास सुरू असून, मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघांवरही गुन्हा नोंदवून लूकआउट नोटीस जारी केली आहे. पुढील चौकशीत दोघांना चौकशीसाठी हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.