सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा: डॉ. अमोल कोल्हे यांचा सडेतोड इशारा
सांगली – महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या निमित्ताने सांगलीत उत्स्फूर्त जनसमुदाय एकत्र आला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंतराव पाटील यांचा वारसा आणि संस्कृत परंपरा यांचा गौरव करण्यात आला.
मोर्चात भाषण करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडच्या राजकीय वातावरणावर थेट हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की,
“महाराष्ट्राची भूमी ही शिव्यांचा नाही तर ओव्यांचा वारसा सांगणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाणपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या सर्व नेत्यांनी ही सुसंस्कृत परंपरा जपली. मात्र काही स्वयंघोषित नेत्यांनी वाचाळवीरांचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ माजवला आहे.”
यावेळी डॉ. कोल्हे यांनी विशेषतः स्व. राजारामबापू पाटील यांचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला. सहकार चळवळीतील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेला समृद्धीचा मार्ग हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
“महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुमच्या सत्तेपेक्षा, राजकीय अस्तित्वापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे, हेच सांगलीत अनुभवले.” – डॉ. अमोल कोल्हे
मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय वारशाचे रक्षण करण्याचा निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.