रोह्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख मिळाली. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीनं पार पडलं. कलाकार सयाजी शिंदे व भरत जाधव यांनी दिलेली भाषणं रंगतदार ठरली.
रोहा | रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण शनिवारी अत्यंत उत्साहात पार पडलं. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत राज्याची मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांनी हजेरी लावली.
नव्या नाट्यगृहाच्या उद्घाटनावेळी रोहात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालं. रोह्यातील नागरिक, स्थानिक कलाकार, सामाजिक संस्था, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मान्य करत सांगितलं, “होय, उशीर झाला… पण हा उशीर माझ्या जबाबदारीतलाच आहे. ही माझी चूक आहे. पण आज नाट्यगृह उभं राहिलं आहे, हेच खरं समाधान आहे.” त्यांच्या या स्पष्ट कबुलीनं टाळ्यांचा कडकडाट झाला.
मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला मिळालेलं स्थानिक सहकार्य अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की, रोहातील कला, साहित्य, रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी हे नाट्यगृह एक मोठं व्यासपीठ ठरेल. खासदार सुनील तटकरे म्हणाले, “ज्यांनी आधी टीका केली होती… तेच आता या नाट्यगृहाचे चाहते झाले आहेत. हीच खरी कामगिरी आहे.”
कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव यांनी भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “हे नाट्यगृह म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठं दान आहे. इथून अनेक कलाकार घडतील, हीच खरी पुण्याई.” त्यांच्या भावनिक वक्तव्याने सभागृहात दाद मिळाली.
यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाट्यगृहात होणाऱ्या पहिल्या नाटकाची घोषणा करत सांगितलं की, “घाशीराम कोतवाल” या सुप्रसिद्ध नाटकाने रोहाच्या रंगमंचावर पहिली घंटा वाजेल. या घोषणेनं प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण झाली.
उद्घाटन समारंभात स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं. नाट्यगृहाच्या भव्य वास्तूचं कौतुक सर्वांनीच केलं. आधुनिक ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना आणि आसनव्यवस्था यामुळे हे नाट्यगृह कोकणातील एक आदर्श सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात आज उत्साहाचं आणि भावनांचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हे भव्य नाट्यगृह रोह्याच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आलं. या सोहळ्यात मंत्री अदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “हे नाट्यगृह उभं राहणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर नवनव्या अडचणी, आपत्ती, संकटं समोर आली. पण आम्ही हार मानली नाही. सर्व अडथळ्यांचा सामना करत, टीका-टिप्पण्यांना उत्तर देत आज हे सभागृह पूर्णत्वास आलं आहे. ही फक्त माझीच नाही, तर रोह्याच्या जनतेची जिद्द आहे.”
त्यांच्या या शब्दांनी उपस्थित प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्थानिक नागरिक, कलाकार आणि मान्यवर यांनी नाट्यगृहाचं महत्त्व अधोरेखित करत मंत्री तटकरे यांचे आभार मानले.
रोहा शहराला या नाट्यगृहामुळे एक वेगळीच सांस्कृतिक ओळख मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. कला आणि संस्कृतीला चालना देणारी ही पायरी, रोहा शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय लिहील, यात शंका नाही.