कोल्हापूर – संकटावर मात करत धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांचा आजचा (दि.6) दिवस अभिमानास्पद ठरला. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (OTA) पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना लेफ्टनंट पद मिळाले.
प्रियांका खोत या दिवंगत नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत. निलेश खोते सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2022 मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्याआधीच प्रियांका यांनी वडिलांना गमावले होते. या दुहेरी आघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
मात्र या परिस्थितीत खचून न जाता प्रियांका यांनी भारतीय सैन्यात सेवा करण्याचा निर्धार केला. त्यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन कठोर परिश्रम केले. आज त्या परेडनंतर लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या.
दरम्यान, या यशाबद्दल प्रियांका म्हणाल्या –
“निलेश यांनी कायम देशसेवा केली. त्यांचा वारसा पुढे नेणं हेच माझं ध्येय आहे. कुटुंब आणि देशासाठी ताकदीने उभं राहणं हेच खरं समाधान आहे.”
कोल्हापूर आणि राज्यभरातून प्रियांकाचे अभिनंदन होत असून त्यांच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.