काठमांडू : नेपाळ सरकारनं घातलेली सोशल मीडिया बंदी अखेर उठवण्यात आली आहे. या बंदीविरोधात झालेल्या आंदोलनात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या “नेपो किड” मोहिमेमुळे राजकीय नेत्यांच्या मुलांच्या ऐशआरामाच्या जीवनशैली आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला जात होता. त्यानंतर सरकारनं फेसबुक, युट्यूबसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.
बंदीविरोधात हजारो तरुणांनी काठमांडूमध्ये संसदेवर धडक दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅनन, लाठ्या आणि रबर बुलेटचा वापर केला.
काही आंदोलकांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक केली. आंदोलकांनी “भ्रष्टाचार थांबवा”, “एनोफ इज एनोफ” असे घोषवाक्य लिहिलेली फलकं दाखवली.
पंतप्रधान ओली यांनी हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आणि “विविध स्वार्थी गटांनी आंदोलनात घुसखोरी केली” असा आरोप केला. मृतांच्या कुटुंबियांना मदत व जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, जोरदार टीकेनंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी संध्याकाळी राजीनामा दिला. सरकारनं घटनांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.