म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.