माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; तीन जणांना अटक, ₹3.80 लाख जप्त
रायगड — जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तपासून कारवाई केली आणि तिघांना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी सुमारे ₹3,80,000 मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत; हा आकडा पुढे वाढण्याची शक्यता अधिक आहे.
तपासात समोर आले की, माणगाव टेमपाले येथील मुफस्सिर उर्फ़ मिनी अब्दुल राशिद खानदेशी यांच्या घरातून बनावट नोटा साठवण्यात आढळल्या. तसेच म्हसळा तालुक्यातील निगडीपाब रे येथील सुनील बाळाराम मोरे व मेहबुब उलडे (राहणार: बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन) हे ही या रॅकेटशी संबधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शनिवारी (20 सप्टेंबर) पोलिसांनी पहिली कारवाई केली. त्यानंतर फरार झालेला मेहबुब उलडे सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आला. चौकशीत बंदोबस्तात असे आढळले की, आरोपी वीस, पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या बाजारात मिसळण्याचा प्रयत्न करत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकरण चर्चेत आले होते आणि काही व्यापाऱ्यांनीही बनावट नोटांमुळे फसवणुकीची तक्रार नोंदवली असल्याचे समोर आले आहे. बनावट नोटा खर्या नोटांसारख्या दिसत असल्याने सामान्य नागरिक गोंधळले गेले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी संपूर्ण साखळीचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संशयास्पद नोटा त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जमा कराव्यात. गोरेगाव पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा सध्या रॅकेटची उर्वरित साखळी उघड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.