केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिला बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), रायगड यांच्या वतीने रोहा तालुक्यातील मौजे वरसे येथे “शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा” आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. आपल्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे सांगत, महिलांनी त्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या कर्जांचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय, ग्राम पातळीवर महिला बचत गटांना सहकार्य करणाऱ्या पुरुष बांधवांना “सुधारक सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ज्येष्ठ ग्रामस्थ, माता-भगिनी, ग्रामपंचायत पदाधिकारी, माविमचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.