कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्य
मैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे.
पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.
राजेशाही परंपरेचं आजही पालन
आजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.