कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
मुंबई/कर्जत — कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत मिळवलेला थोरवे यांचा विजय कायम राहिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जल्लोष साजरा केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (महायुती) उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केवळ 5,700 मतांच्या अल्पाधिक्याने विजय मिळवला होता. पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत, “थोरवे यांनी डमी उमेदवार उभा करून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केला” असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर सहा महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र अखेरीस न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने सुधाकर घारे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात घारे यांना मताधिक्य असल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे या दाव्याचे वजन कमी झाले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कर्जत व खालापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की या निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच सुमारे 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर दिसून येण्याची शक्यता आहे.
यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय प्रभाव आगामी काळात आणखी दृढ होणार असल्याचे दिसून येत आहे.