रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील 39 लाखांच्या फसवणुकीनंतर आता चिपळूणमध्येही ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनीच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील भावंडांची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंपनीच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील इंटक भवन येथे असलेल्या TWJ कंपनीच्या कार्यालयातून हा सगळा कारभार चालत होता. आरोपी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांनी स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी सांगत प्रतिक दिलीप माटे आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांचा विश्वास संपादन केला. महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी प्रतिक माटे यांच्याकडून 3.5 लाख आणि त्यांच्या बहिणीकडून 25 लाख रुपये गुंतवून घेतले. जानेवारी 2023 पासून आजपर्यंत या दोघांनी मिळून 28.5 लाख रुपये गुंतवले.
मात्र, मे 2025 नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कमही न परतवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, TWJ कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला मोठा नफा दाखवून आकर्षित केले होते. एका लाख रुपयांवर महिन्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. हळूहळू हा दर 6, 5, 4 आणि 3 टक्क्यांपर्यंत कमी झाला. काही गुंतवणूकदारांनी सुरुवातीला दामदुप्पट नफा घेतला, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पुढे कंपनीने गुंतवणूक थांबवली आणि फसवणूक उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी अशा हाय-प्रोफाईल लोकांकडून करोडो रुपये गोळा केले असून, हा गैरव्यवहार तब्बल 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. कंपनीकडे इव्हेंट, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग, लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवास्तव आमिषांना बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच गुंतवणूक करावी.