चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी :
महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
श्री सदस्यांच्या वतीने चिपळूण शहरात सकाळी साडेसात ते ११ या वेळेत भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हजारो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.
“श्री सदस्यांनी ज्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने चिपळूण शहर स्वच्छ केले, ते पाहून मनापासून अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेले संस्कार आणि समाजसेवेचा संदेश आजही त्यांच्या कार्यातून जिवंत असल्याचे दिसते,” असे नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारे वृक्षारोपण उपक्रमही प्रेरणादायी आहेत. केवळ वृक्षारोपण न करता ती झाडे जपण्याची जबाबदारी श्री सदस्य स्वतः घेतात, ही बाब उल्लेखनीय आहे. स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श समाजासाठी मार्गदर्शक आहे.”
नगराध्यक्षांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. श्री सदस्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी स्वच्छ आणि सुंदर चिपळूण घडवूया.”
समारोप प्रसंगी नगर परिषदेच्या वतीने श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक अंकुश आवले, कपिल शिर्के, वैशाली कदम, शिल्पा देसाई, अजय भालेकर, नसरीन खडस, शहनाज वांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार आरोग्य निरीक्षक सुजित जाधव व श्री सदस्य मनोज पवार यांनी मानले.
—
लेखक : कोंकणधारा डेस्क















