चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी :
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आज रविवारी चिपळूण शहरात श्री सदस्यांच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळपासूनच शहरातील विविध भागांत स्वच्छतेसाठी पथके कार्यरत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले, नगरसेविका शिल्पा देसाई, वैशाली कदम तसेच नसरीन खडस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि बायपास परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत ही मोहीम उत्साहात पार पडली.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मार्कंडी व गुहागर बायपास रोड परिसरात उपस्थित राहून स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि श्री सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.
दरवर्षी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला जातो. यंदाही हजारो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी आणि नागरिक सहभाग याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
लेखक : कोंकणधारा डेस्क















