बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.
रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत.
बीडकरांचं स्वप्न अखेर साकार
गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
उद्घाटनाची उत्सुकता शिगेला
बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत.
“बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.