संभाजीनगर : भाजप आमदार पत्नीला पती अधिकाऱ्याचं थेट पत्र – “माझे फोटो वापरु नका!”
संभाजीनगर : ग्रामीण भागात बहुतेक वेळा पत्नी पुढारी पण पती कारभारी असं चित्र दिसून येतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला आरक्षणाचा फायदा घेत अनेक महिला सरपंचपदावर विराजमान झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष गावचा कारभार पतीच पाहतो, अशी प्रथा रूढ आहे. अगदी आमदार पातळीवरही हीच परिस्थिती काही वेळा पाहायला मिळते.
मात्र, संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात याच पार्श्वभूमीवर एक वेगळीच घटना घडली आहे. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतींनी – जे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत – थेट आमदार पत्नीला पत्र लिहून कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. कारण, मागील काही दिवसांत भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये, वृत्तपत्र जाहिरातींमध्ये आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती अतुल चव्हाण यांचे फोटो मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “माझा फोटो बॅनर किंवा जाहिरातींवर लावल्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी दाखल होत आहेत तसेच माहिती अधिकारांतर्गत अर्ज येत आहेत. त्यामुळे हे टाळावं.” त्यांनी आमदार पत्नीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी सूचना करण्याची मागणी केली आहे.
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एका बाजूला पती हा वरिष्ठ अधिकारी, तर पत्नी आमदार – अशा या प्रकरणामुळे प्रशासनिक आचारसंहितेचा मुद्दाही पुढे येतोय. पती-पत्नीच्या या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.