कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले.
या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवस विविध मनोरंजक स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम ठेवले होते. त्यात विशेष आकर्षण ठरली पाककला स्पर्धा. या स्पर्धेतून गावातील महिलांची कला आणि परंपरा पुढे आली.
या पाककला स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘शोध सुगरणीचा’ हा मान राणी म्हात्रे यांना मिळाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
वर्से गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार झाला आहे.