मुंबई : सोशल मीडियावर “ऐका ना…” अशी साद घालत आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई हिने लग्नगाठ बांधली आहे. रविवारी, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिचा विवाह पार पडला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘दशावतार’ फेम असलेल्या स्वानंदीने कोणताही दिखाऊपणा न करता अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. तिच्या पतीचे नाव विक्रांत रामदास असून तो लेखक व दिग्दर्शक आहे. ‘इंदिरा’ या लघुपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.
लग्नसोहळ्यात स्वानंदीने हिरव्या रंगाची नववारी साडी परिधान केली होती. पारंपरिक नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि गळ्यातील दागिन्यांमुळे तिच्या रूपात विशेष खुलून आले होते. तर विक्रांत रामदास याने पांढऱ्या रंगाचे धोतर, सदरा आणि शेला असा पारंपरिक वेश परिधान केला होता. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
कोकणातील निसर्ग आणि साध्या जीवनशैलीशी घट्ट नातं जपणारी स्वानंदी तिच्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते. तिच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावरून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.















