नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे फायरब्रँड नेते खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी पाडल्याचा जो कांगावा भाजप करत आहे, तो पूर्णपणे पायाहीन असून भाजपचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे, असा घणाघात त्यांनी केला. संजय सिंह यांनी कागदपत्रे दाखवत ठणकावून सांगितले की, २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक १६ एप्रिल २०२६ रोजीच अधिसूचित झाले असून ते आज देशात लागू आहे. मग काल नेमका कोणता खेळ खेळला गेला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारची पोलखोल केली.
संजय सिंह यांनी भाजपला घेरताना म्हटले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली ‘डीलिमिटेशन’ म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचे जे पाप सरकार करू पाहत होते, ते केवळ देशाच्या तुकडे-तुकडे गँगचा अजेंडा होता. या विधेयकाच्या आडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात वादाची ठिणगी टाकण्याचे कारस्थान रचले गेले होते. तामिळनाडू आणि बंगालसारख्या राज्यांच्या संसदेतील जागा कमी करून त्या राज्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत होते, ज्याला आम्ही आणि संपूर्ण इंडिया आघाडीने खंबीरपणे विरोध करून धूळ चारली आहे. “आम्ही देश तुटू देणार नाही आणि राज्या-राज्यांमध्ये भांडणे लावण्याचा भाजपचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
भाजपच्या मातृसंस्थेवर निशाणा साधताना संजय सिंह म्हणाले की, ज्या आरएसएसने १०० वर्षांच्या इतिहासात कधीही एका महिलेला प्रमुख पद दिले नाही आणि ज्या भाजपमध्ये महिलांना केवळ निवडणुकीचे साधन मानले जाते, त्यांनी आम्हाला महिला हित शिकवू नये. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली तेव्हा मोदीजी गप्प होते, हाथरस आणि अंकिता भंडारी प्रकरणात भाजपचे नेते बलात्काऱ्यांना संरक्षण देत होते, तेव्हा त्यांचे महिला प्रेम कुठे गेले होते, असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सहानुभूती मिळवण्यासाठी हा सारा प्रपंचा रचला गेला होता, पण आता हा डाव भाजपवरच उलटला असून दक्षिण भारतातून त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय सिंह यांनी एका स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. बाबरी मशीद बांधण्याचा दावा करणाऱ्या हुमायून कबीरला भाजपने १००० कोटी रुपये दिले असून केंद्र सरकारने त्याला झेड श्रेणीची सुरक्षा का पुरवली आहे, याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप एका बाजूला धर्माचे राजकारण करते आणि दुसरीकडे पडद्यामागून काय खेळ खेळते, हे आता जनतेला समजले आहे. शेवटी, महिला आरक्षण सुरक्षित आहे आणि राहील, पण भाजपचे ‘डीलिमिटेशन’चे राजकारण आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा वज्रनिर्धार त्यांनी व्यक्त केला.



















