रत्नागिरी: रत्नागिरीजवळील आरे समुद्रकिनारी शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील निशांत राजेश ठाकरे (वय २४) याचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकितकुमार राकेशकुमार सिंह आणि त्यांचे मित्र शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता आरे येथे फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनारी पोहत असताना निशांत ठाकरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली असून बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती.
रविवारी (१२ एप्रिल) सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी फडजीवाडी मारुती मंदिराजवळील समुद्रकिनारी एक मृतदेह आढळून आला. पोलिस पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निशांतच्या मित्रांनी, वडिलांनी आणि नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रकिनारी फिरताना आणि पोहताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.















