सावर्डे : शिवसेना नेते व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक, निवळी-पालवण येथील प्रख्यात उद्योजक रमेशशेठ शिवाजी रेपाळ यांचे दि. २४ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
रमेशशेठ रेपाळ हे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समितीच्या माजी सदस्या संध्याताई रेपाळ यांचे पती होते. निवळी-पालवण परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, दूरदृष्टी असलेले आणि समाजासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. श्री हनुमान सेवा मंडळ, निवळी कोष्टेवाडीचे सल्लागार, खाजगी नळ पाणी योजनेचे माजी अध्यक्ष तसेच देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरीचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.
त्यांच्या निधनाने परिसराने एक कर्तृत्ववान, दिलदार आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी समाजाच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना व्यक्त करत विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी पालवण येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे — सुजित व सनी उर्फ मंदार, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.















