शेतकरी-बागायतदारांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी, दि. १२ : नाणार आणि परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी व आंबा बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर या प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह नाणार परिसरातील शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, “नाणार बॉक्साईट प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांची भूमिका हीच आमची भूमिका आहे. जवळपास १०० टक्के खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विरोधाची पत्रे दिली आहेत. अशा परिस्थितीत लोकांवर कोणताही प्रकल्प लादला जाऊ नये.”
राजापूर पंचायत समितीनेही एकमताने जनसुनावणी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार प्रशासनाने सुनावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून पावसाळ्यानंतर पुन्हा लोकप्रतिनिधी, नागरिक आणि शासन स्तरावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनिंगसाठी हापूसला ५० रुपये किलो दर
दरम्यान, जीआय मानांकन प्राप्त रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याच्या कॅनिंग दराबाबतही बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एक्स्टॅसिक कॅनिंग कंपनीने आंबा बागायतदारांना प्रतिकिलो ५० रुपये दर देण्यास सहमती दर्शविली.
तसेच “रत्नागिरी हापूस” किंवा “देवगड हापूस” नावाने कर्नाटकातील आंब्यांची विक्री होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले. यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीत पोलीस, कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. संशयित आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करून त्या सील करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीत ‘सारथी’चे विभागीय कार्यालय सुरू होणार
सारथी संस्थेचे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. तसेच सारथीशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.















